नाशिक

Nashik Crime News : 14 मुलांच्या आईचे हृदयद्रावक कृत्य! – नाशिकमध्ये पैशांसाठी 6 मुले विकल्याचा धक्कादायक प्रकार, पोलीस व प्रशासनाकडून सखोल तपास सुरू

•त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भरड्याची वाडी येथील घटना; 10 हजारांत बाळ विकल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा; कुटुंबाची हलाखीची परिस्थिती उघड

नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोटीजवळ असलेल्या भरड्याची वाडी येथे एका 14 मुलांच्या जन्मदात्या आईने आपल्या 6 मुलांना पैशांसाठी विकल्याची हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला असून, सामाजिक कार्यकर्त्यांच्या दाव्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचा गंभीर दावा

सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केलेल्या दाव्यानुसार, घोटीजवळच्या भरड्याची वाडी येथे राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेला एकूण 14 मुले होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या या महिलेने आपल्या 14 मुलांपैकी 4 ते 6 मुलांना पैशांसाठी विकले. मधे यांनी माहिती दिली की, महिलेला 14 वे मूल झाले तेव्हा तिने तपासणीही केली नव्हती. सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला रुग्णालयात दाखल करून तिची सुरक्षित प्रसूती केली होती. मात्र, डिलिव्हरी होऊन दोनच महिने झाले असताना त्या मातेने ते बाळ अवघ्या 10 हजारांमध्ये एका व्यक्तीला विकल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
या घटनेसाठी भगवान मधे यांनी प्रशासन आणि शासनाला जबाबदार धरले आहे. ‘आजही पैशासाठी कुठल्याही मातेला आपल्या पोटच्या गोळ्याला विकावं लागतं, याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. त्यांनी आतापर्यंत काय केलं? या मातेला घरकुल मिळालं नाही,’ असा आरोप मधे यांनी केला.

आशा सेविका आणि पोलिसांचा पाठपुरावा

स्थानिक आशा सेविका वजन काटा घेऊन या कुटुंबाच्या घरी गेल्या असता, महिलेने ‘बाळ नाही, देऊन टाकले’ असे सांगितले. हे बाळ दीड महिन्याचे होते. आशा सेविकेने लगेच वरिष्ठांना याची कल्पना दिली आणि त्या बाळाचा पाठपुरावा सुरू केला.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी तातडीने महिलेच्या घरी पोहोचले.

पोलिसांची माहिती

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना काही मुले विकली गेली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रत्यक्ष माहिती घेतली असता कुटुंबात 14 पैकी 12 मुले जिवंत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 1 मूल मयत आहे. तर 3 मुले तीन वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत.

पोलिसांनी ज्यांच्याकडे ही मुले दिली होती, त्या तिन्ही कुटुंबांना आणि मुलांना घोटी पोलीस स्टेशनला आणले आहे. सध्या आई-वडील आणि इतर 11 मुले घोटी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. मुलांच्या विक्री किंवा हस्तांतरणाच्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आता साईल्ड वेल्फेअर कमिटी (CWC) मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. संशयित दाम्पत्य सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0