Nandurbar Accident News : नंदूरबारमध्ये भीषण अपघात! चांदशैली घाटात पिकअप व्हॅन उलटली; 6 भाविकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Nandurbar Accident News : अस्तंबा यात्राहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 10 हून अधिक जण गंभीर जखमी
नंदूरबार :- नंदूरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज, शनिवारी एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. अस्तंबा यात्राहून माघारी परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात झाला असून, या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
नेमका अपघात कसा झाला?
प्राथमिक माहितीनुसार, अस्तंबा यात्रा संपवून भाविकांना घेऊन जाणारी एक पिकअप गाडी (व्हॅन) चांदशैली घाटातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव पिकअप गाडी पलटी झाली. गाडीच्या मागच्या भागात बसलेले भाविक खाली दबले गेले आणि अनेकांना जबर मार लागला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बचावकार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात नेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. यापैकी सुमारे 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळावरील दृश्य अत्यंत भयावह होते. जखमी अवस्थेत अनेक लोक रस्त्यावर पडून होते. त्यांच्या गंभीर स्थितीमुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.सध्या जखमींवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



