Nanakram Nebhnani : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचं धक्कादायक वक्तव्य ; महिलांना बंदूका बाळगण्याची परवानगी द्या, माझ्याकडून बंदूक वाटप करेल…
•शिवसेना शिंदे गटाचे नानकराम नेभनानी यांचे वक्तव्य ;महिलांना रिवाल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी, त्यांनी परवानगी दिली तर मी अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्या कडून रिवाल्वर घेऊन देईल
अमरावती :- शिवसेना शिंदे गटाच्या अमरावतीच्या नेत्याने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह देशभर या घटनेचे पडसाद उमटले. यादरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते मुर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी यांनी सरकारने महिलांना स्वसंरक्षणार्थ रिव्हॉल्वर हाताळण्याची परवानगी द्यावी, मी त्यांना रिव्हॉल्व्हर घेऊन देतो, असे वादग्रस्त वक्तव्य अमरावतीत केले आहे.
बांगलादेश येथे झालेल्या हिंदू मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कारवाई करणार आहेच. मात्र मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, महिलांना रिवाल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी, त्यांनी परवानगी दिली तर मी अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्या कडून रिवाल्वर घेऊन देईल, असे अजब दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी यांनी केला आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारच्या निषेधार्थ आणि पिडीत हिंदूंच्या समर्थनार्थ अमरावती शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. या विराट मोर्चात भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह हजारो अमरावतीकर रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहे. यात भाजपचे खासदार अनिल बोंडे, नवनीत राणा देखील सहभागी झाल्या होत्या.दरम्यान, हा मोर्चा नेहरू मैदानावरून सुरू झाला असून इर्विन चौकात जाहीर सभा झाल्यावर या मोर्चाचे समापन होणार होतं. यावेळी बोलताना नानकराम नेभनानी यांनी हे वक्तव्य केले आहे.