Nalasopra Drug Racket : नायजेरियन महिलेकडून 2.25 कोटींचा ‘एम.डी.’ अंमली पदार्थ जप्त

Tulij Police Arrested Drug Peddler’s : तुळींज पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई,1.125 किलो एम.डी., रोख रक्कम व दोन मोबाईल जप्त
नालासोपारा :- तुळींज पोलिसांच्या Tulij Police Staion अंमली पदार्थ विरोधी पथकाने नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव परिसरात कारवाई करत एका नायजेरियन महिलेकडून तब्बल 2.25 कोटी रुपयांचा ‘एम.डी.’ नावाचा अंमली पदार्थ जप्त केला. प्रियंका अपार्टमेंटमध्ये सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली असून, आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई 21 मे रोजी सायंकाळी पोलिस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, अंगात पांढरा टी-शर्ट, ब्राऊन पॅन्ट आणि गळ्यात ब्राऊन रंगाची बॅग घेतलेली महिला प्रियंका अपार्टमेंट परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आली होती.
तत्काळ पथकाने घटनास्थळी जाऊन संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिची विचारपूस केली असता तिने आपले नाव अँथनी ओडिना (वय 43) असे सांगितले. पंचासमक्ष तिची अंगझडती घेतली असता 1 किलो 125 ग्रॅम वजनाचा, सुमारे 2.25 कोटी रुपये किंमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ आढळून आला. याशिवाय तिच्याकडून 36,000 रुपये रोख रक्कम, 500 रुपयांच्या 72 नोटा व सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्याच्या कलम 8(क), 21(क) व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम 14 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक करून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर मोरे करीत आहेत.



