क्राईम न्यूजमुंबई
Trending

Nalasopara Police News : बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; दोन पोलिसांसह तिघांना अटक

Nalasopara Latest Crime News : छळाला कंटाळून चौहान यांनी घेतला टोकाचा निर्णय; चिठ्ठीत पोलिसांची नावे

नालासोपारा: नालासोपाऱ्यातील बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान यांच्या आत्महत्येने संपूर्ण पोलीस यंत्रणेला हादरा बसला आहे. चौहान यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर सापडलेल्या चिठ्ठीत दोन पोलीस अधिकारी आणि एका एजंटाच्या मानसिक छळाचा उल्लेख आढळून आल्याने प्रकरण गंभीर वळणावर गेले आहे. या प्रकरणी श्याम शिंदे, राजेश महाजन (दोघे पोलीस अधिकारी) आणि एजंट लाला लजपत यांना अटक करण्यात आली असून, तिघांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Nalasopara Latest Crime News

जयप्रकाश चौहान हे ‘ओम श्री दर्शन’ या इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित होते. त्यांनी श्याम शिंदे यांच्याकडून 50 लाखांचे कर्ज घेतले होते. वर्षभरात दुप्पट रक्कम मिळवण्याच्या अटीवर हे कर्ज देण्यात आले होते. जामीन म्हणून चौघा फ्लॅट्सचा ताबाही शिंदेने घेतला होता. परंतु बिल्डिंगचे काम रखडल्याने, शिंदे व त्याचे सहकारी राजेश महाजन आणि एजंट लजपत यांनी चौहान यांच्यावर आर्थिक आणि मानसिक दबाव आणण्यास सुरुवात केली.

22 लाख रुपये ऑनलाईन व 10 लाख रोख दिल्यानंतरही उर्वरित रकमेची जबरदस्ती, तसेच खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप चौहान यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अखेर या छळाला कंटाळून चौहान यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 351(2), 352 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल केला.

पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी शिंदे आणि महाजन या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबित केल्याचे स्पष्ट केले आहे. दोघांची कारकीर्द आधीपासूनच वादग्रस्त होती. शिंदे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेत तर महाजन आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. विरारमधील एका हॉटेलमधील भागीदारी, बदली टाळण्याचा प्रयत्न आणि स्थानिक राजकीय वरदहस्तामुळे हे अधिकारी वर्षानुवर्षे एकाच परिसरात कार्यरत असल्याची जोरदार चर्चा आहे.

या प्रकरणामुळे वसई-विरार परिसरातील पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशी आणि कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0