Nalasopara Crime News : 16 वर्षांपासून फरार ‘मोस्ट वॉन्टेड’ आरोपीला बेड्या; नालासोपारा पोलिसांची मध्यप्रदेशापर्यंत धाव

Nalasopara Double Murder Criminal Arrested : दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सोने कारागीर निघाला; उत्तर प्रदेशातील आणखी एका खुनाची दिली कबुली
नालासोपारा | नालासोपारा पोलिसांनी तब्बल 16 वर्षांपूर्वीच्या एका खळबळजनक दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. 2009 पासून आपली ओळख लपवून मध्यप्रदेशात वास्तव्य करणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला गुन्हे प्रकटीकरण शाखेने (DB) शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याने उत्तर प्रदेशातील आणखी एका जुन्या खुनाची कबुली दिल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. Nalasopara Double Murder Criminal Arrested
काय होते 2009 चे हत्याकांड?
एप्रिल 2009 मध्ये नालासोपारा पूर्वेतील बिलालपाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. मयत विनोद शंकरलाल जयस्वाल हे आरोपींकडे आपल्या दलालीचे पैसे घेण्यासाठी गेले होते. मात्र, आरोपींनी संगनमत करून विनोद यांचे हातपाय दोरीने बांधले आणि टॉवेलने गळा आवळून त्यांची क्रूरपणे हत्या केली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात Nalasopara Police Station खुनाचा (BNS 302) गुन्हा दाखल झाला होता. यातील काही आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, मात्र मुख्य आरोपी गेल्या 16 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
अशी झाली आरोपीची अटक
वरिष्ठांच्या आदेशानुसार फरार आरोपींचा शोध घेत असताना, गुन्हे प्रकटीकरण पथकाला माहिती मिळाली की, मुख्य आरोपी अविनाश लालताप्रसाद सोनी (वय 42) हा आपली ओळख लपवून भोपाळ आणि इटारसी (मध्यप्रदेश) येथे राहत आहे. तो सध्या नायगाव परिसरात सोने कारागीर म्हणून काम करत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी नायगाव पूर्व भागात सापळा रचला. 22 डिसेंबर 2025 रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले असून, सखोल चौकशीत त्याने 2009 मधील त्या खुनाची कबुली दिली आहे.
उत्तर प्रदेशातील गुन्ह्याचाही खुलासा
अविनाश सोनीची अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. 1998 मध्ये उत्तर प्रदेशातील आझमगड येथे होळीच्या दिवशी त्याने आपल्या चार मित्रांच्या मदतीने एकाची हत्या केली होती. या माहितीनंतर कोतवाली पोलीस ठाणे (आझमगड) यांच्याशी संपर्क साधून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलीस पथकाची कामगिरी
पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव बादवड, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदार प्रशांत साळुंके, अमित तटकर, कल्याण बाचकर व इतर सहकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.


