मुंबई

Nagpur Winter Session : भरसभागृहात ‘जादू की झप्पी’! – नितेश राणेंच्या ‘टोला’ मारताच आदित्य ठाकरेंकडून भास्कर जाधवांना मिठी, विधानसभेत हशा पिकला

Nagpur Winter Session : मच्छीमार बोर्डावरून कोकणी नेत्यांची शाब्दिक जुगलबंदी; राणेंच्या मिश्किल विधानानंतर सभागृहातील वातावरण झाले हलकेफुलके

नागपूर :- राज्याच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session) आज सभागृहात अनेकदा एकमेकांवर टीका करणाऱ्या कोकणातील दोन नेते—मंत्री नितेश राणे Nitesh Rane आणि आमदार भास्कर जाधव—यांच्यातील मिश्किल जुगलबंदीने सर्वांचे लक्ष वेधले. याच जुगलबंदीचा परिणाम म्हणून आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी भरसभागृहात भास्कर जाधव यांना मिठी मारल्याची घटना घडली.
मच्छिमारांच्या प्रश्नावर चर्चा करताना भास्कर जाधव यांनी मंत्री नितेश राणे यांना मच्छीमार बोर्डाचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना केली आणि गरज पडल्यास आपण मदत करू, असे सांगितले.

यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी भास्कर जाधवांचे कौतुक केले, पण लगेचच आदित्य ठाकरे यांना कोपरखळी मारली. “भास्कर जाधव हे ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांच्या सूचना चांगल्या असतात. त्यांना वाटतं मी ऐकत नाही, पण त्यांचाही टोन आदित्य ठाकरे बाजूला असल्यावर वेगळा असतो आणि नसले तर वेगळा असतो,” असे ते म्हणाले. राणे पुढे म्हणाले की, ‘वैयक्तिक भेटल्यावर ते (जाधव) मिठीही मारतात’.

राणे यांनी मिठी मारण्याचा उल्लेख करताच, भास्कर जाधवांच्या शेजारी बसलेल्या आदित्य ठाकरे यांनी तात्काळ उभे राहून भास्कर जाधव यांना प्रेमाने मिठी मारली, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. नितेश राणे यांनीही हसून दाद दिली. राणे यांनी जाधव यांची सूचना मान्य करत म्हटले की, “मी आपल्यासमोरच ही मिटींग लावेल, कारण आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला, कोकणाला आणि मच्छिमारांनाही पाहिजे.”

vivek

Recent Posts