Nagpur News : सभागृहात ‘बिबट्या’ अवतरला! – जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचा विधानसभेत अनोखा प्रवेश, बिबट्याचे हल्ले ‘राज्य आपत्ती’ घोषित करण्याची मागणी

•”55 बळी गेले, मुलं शाळेत जात नाहीत!” – मानवी वस्तीवरील वाढत्या हल्ल्यांवरून सभागृहात खळबळ, ’90 दिवसांत रेस्क्यू सेंटर उभारून नसबंदी करा’ असा कडक इशारा
नागपूर :- राज्यात बिबट्यांनी मानवी वस्तीवर घातलेल्या धुमाकुळामुळे लहान मुलांना जीव गमवावा लागत असताना, या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आज हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधले. त्यांनी बिबट्याचा वेष परिधान करून विधानसभेत प्रवेश केला, ज्यामुळे नागपुरात मोठी चर्चा रंगली आणि या प्रश्नाचे गांभीर्य सभागृहाबाहेरही पोहोचले.
बिबट्या हल्ल्यांची गंभीर स्थिती
आमदार सोनवणे यांनी बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. त्यांनी दावा केला की, राज्यात सध्या बिबट्यांची संख्या 9 ते 10 हजार झाली आहे. “माझ्या जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत 55 लोकं बिबट्यांच्या हल्ल्यात दगावली आहेत,” अशी धक्कादायक आकडेवारी त्यांनी सभागृहात मांडली.
ते म्हणाले, आमची मुलं अंगणात नाही, रस्त्यावर दिसत नाही, शाळेमध्ये जात नाहीत. बिबट्यांना पकडायचे सोडून सरकार महिलांना आणि मुलांना मानेला लोखंडी पट्टा लावण्याचा सल्ला देत आहे. “आम्हाला आता घराभोवती तारेचं कुंपण करून त्यात करंट सोडून बसण्याची वेळ आली आहे,” अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.
आक्रमक मागणी आणि तोडगा
सोनवणे यांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने बिबट्यांचे हल्ले ‘राज्य आपत्ती’ घोषित करण्याची मागणी केली. “बिबटे आता रात्रीच नाही, तर दिवसासुद्धा हल्ले करत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
यावर तोडगा म्हणून त्यांनी 90 दिवसांत रेस्क्यू सेंटर तयार करण्याची विनंती केली. राज्यात दोन हजार बिबटे राहतील असे केंद्र तयार करा. एक हजार मादी बिबट्या आणि नर बिबट्या वेगळे करून नसबंदीचा विषय मिटवा, असे ते म्हणाले.
तसेच, बिबट्या हा ‘शेड्यूल्ड एक’चा प्राणी नाही, तो ‘शेड्यूल्ड दोन’चा प्राणी असल्याने त्याला त्यातच टाकावे. “मयताच्या कुटुंबाला 25 लाख रुपये मदत देण्यापेक्षा व्यक्ती वाचवा,” असे सांगत, यापुढे एकही शेतकऱ्याचा किंवा त्यांच्या मुलाबाळांचा बळी आम्हाला मान्य नाही, असा कडक इशाराही त्यांनी सरकारला दिला.



