Sanjay Raut : “शक्तीपीठ महामार्ग की शोषणाचा राजमार्ग?”राऊतांचा आरोप: ठेकेदार, मंत्री आणि सत्ता केंद्रांचा पैशांचा खेळ सुरू

Sanjay Raut Latest News : “ड्रीम प्रोजेक्टमधून कमिशनचं कारस्थान; महाराष्ट्र लुटला जातोय” — संजय राऊत
मुंबई | राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या ‘शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी याची स्तुती सुरू केली असताना, विरोधी पक्षाकडून मात्र तीव्र टीका केली जात आहे. खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी या प्रकल्पामागे “घोटाळ्यांचं मोठं जाळं” असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला चढवला आहे.
शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल 20 हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. हा महामार्ग साडेतीन शक्तीपीठ, दोन ज्योतिर्लिंग, पंढरपूर आणि आंबेजोगाईसह 18 तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. यासाठी 12 जिल्ह्यांतील 27,500 एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. मात्र, संजय राऊत यांच्या मते, “हा धार्मिक नव्हे तर राजकीय आर्थिक प्रकल्प आहे.”
राऊत म्हणाले की, “शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली हजारो कोटी रुपये ठेकेदारांमार्फत बाहेर काढले जातील. त्यातील अर्धा निधी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये मतं आणि माणसं विकत घेण्यासाठी वापरण्यात येईल.”
त्यांनी समृद्धी महामार्गाचं उदाहरण देत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होऊन 19 दिवसही झाले नाहीत, आणि आज तिथं खड्ड्यांचा पसारा आहे. ड्रीम प्रोजेक्ट म्हणायचं आणि निम्मे पैसे राजकारणात ओतायचे. हेच मॉडेल शक्तीपीठ महामार्गालाही लागू केलं जातंय.”
यावेळी माळेगाव साखर कारखान्याच्या अनुदानावरूनही राऊत भडकले. “एका कारखान्यासाठी 500 कोटी कुठून येतात? त्यासाठी उपमुख्यमंत्री खुर्ची टाकून 20 दिवस गावात बसतात. ही अवस्था महाराष्ट्राची झाली आहे — सत्ताधाऱ्यांकडून उघडपणे लूट सुरु आहे. मंत्र्यांनी आणि ठेकेदारांनी मिळून खिसे आणि बॅगा भरायचं कारस्थान चालवले आहे,” असा संतप्त आरोप त्यांनी केला.


