क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Nagpada Police News: सांताक्रुझ लुटून बिहारला पळणाऱ्या टोळीचा नागपाडा पोलिसांकडून थरारक पाठलाग; 72 लाखांचे दागिने जप्त

Nagpada Police Latest News : पहाटेच्या सुमारास सापळा रचून तिघांना बेड्या; चोरीच्या पैशातून केली होती ग्रोसरीची खरेदी, सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश

मुंबई | सांताक्रुझ परिसरात कोट्यवधींच्या घरफोडीचा गुन्हा करून मुद्देमालासह बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीचा नागपाडा पोलिसांनी अत्यंत शिताफीने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून सोन्या-हिऱ्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 72 लाख 77 हजार 854 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नागपाडा पोलिसांच्या या सतर्कतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला असून चोरी गेलेला मुद्देमाल सुरक्षित परत मिळवण्यात यश आले आहे.

गुप्त माहिती अन् पहाटेची धाड

नागपाडा पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना 6 जानेवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास एक महत्त्वाची माहिती मिळाली. घरफोडीच्या गुन्ह्यातील काही संशयित आरोपी चोरीच्या मालासह मुंबई सोडण्याच्या तयारीत असून ते नागपाडा हद्दीतून जाणार असल्याची ती माहिती होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या फुलो मोहन मुखिया, संतोष रामजीवन मुखिया आणि लालू मोहन मुखिया या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडे असलेल्या पिशव्यांमध्ये सोन्याचे आणि हिऱ्याचे मौल्यवान दागिने आढळून आले.

असा झाला गुन्ह्याचा उलगडा

आरोपींकडे सापडलेल्या दागिन्यांबाबत ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. सखोल तपासात असे निष्पन्न झाले की, या त्रिकुटाने सांताक्रुझ परिसरात एका घराचे कुलूप तोडून मोठी घरफोडी केली होती. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 (अ) आणि 331 (4) अन्वये गुन्हा दाखल होता. जप्त केलेल्या मुद्देमालात दागिन्यांव्यतिरिक्त 35 हजार रुपयांची रोकड, दोन महागडे मोबाईल आणि विशेष म्हणजे चोरीच्या पैशातून खरेदी केलेली सुमारे 20 हजार रुपयांची ग्रोसरी (किराणा माल) जप्त करण्यात आली आहे.

सराईत गुन्हेगारांचे जाळे

अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे मूळचे बिहार राज्यातील असून त्यांच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये लालू मुखिया याच्यावर गावदेवी पोलीस ठाण्यात 6 गुन्हे, संतोष मुखिया याच्यावर 4 तर फुलो मुखिया याच्यावर 2 गुन्हे नोंद आहेत. हे सर्वजण सराईत घरफोडे असून गुन्हा केल्यानंतर ते काही काळ गावी पळून जात असत. मात्र, नागपाडा पोलिसांनी त्यांचे हे मनसुबे उधळून लावले आहेत. नागपाडा पोलिसांनी जप्त मुद्देमालासह या आरोपींना सांताक्रुझ पोलिसांच्या स्वाधीन केले असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0