
Mumbai Rain Latest News : कल्याण पुढे तांत्रिक बिघाड, घाटकोपर स्टेशनबाहेरही पाणी साचले; चाकरमान्यांची मोठी गैरसोय
मुंबई :- मुंबईत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर, आज सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल गाड्यांच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. Mumbai Rain Update
लोकल सेवांवर मोठा परिणाम
मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विशेषतः, माटुंगा रेल्वे स्थानकातील ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलही 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच, एरवी फारसा परिणाम न होणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गालाही पावसाचा फटका बसला असून, या मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, सर्वांना गाड्यांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे.
तांत्रिक बिघाड आणि सखल भागांत पाणी
पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर इतके पाणी साचले आहे की प्रवाशांना स्टेशनपर्यंत पोहोचणेही अवघड झाले आहे. याशिवाय, कल्याणच्या पुढे शहाड आणि आंबिवली स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने कसारा, आसनगाव आणि टिटवाळ्याहून येणाऱ्या लोकल सेवांवरही मोठा परिणाम झाला आहे. हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेनेही नागरिकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.



