
Mumbai Water level Dam Full : सात पैकी एक धरण पूर्ण क्षमतेने भरलं; दरवाजा उघडून 1022 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
मुंबई | मुंबईच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या सात धरणांपैकी एक, मोडक सागर धरण (निम्न वैतरणा) बुधवारी (9 जुलै) सकाळी 6.27 वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले. त्यामुळे मुंबईकरांसाठी पाणीकपात होण्याची चिंता दूर झाली आहे. धरणाचा एक दरवाजा 1 फूट उघडून प्रतिक्षण 1022 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. 9 जुलै 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत सातही धरणांमध्ये 72.61 % पाणीसाठा नोंदवला गेला, जो की मागील 10 वर्षांतील सर्वाधिक आहे. तुलनात्मकदृष्ट्या, 2024 मध्ये या दिवशी साठा 20.48% होता, तर 2023 मध्ये 23.11% इतकाच होता.
मोडक सागर धरणाची एकूण साठवण क्षमता 12,892.5 कोटी लिटर आहे. हे धरण सहसा जुलैच्या अखेरीस भरतं, मात्र यंदा दुसऱ्याच आठवड्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. यामागे एक कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी 90% भरलेल्या मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडून विसर्ग सुरू केल्यामुळे त्याचे पाणी मोडक सागरमध्ये साठवले गेले.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक असून आणखी पावसाचे दिवस बाकी असल्याने मुंबईचा पाणीसंकटाचा धोका मोठ्या प्रमाणात टळला आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा
उर्ध्व वैतरणा – 73.18 टक्के
मोडक सागर – 99.99टक्के
तानसा – 77.60 टक्के
मध्य वैतरणा – 93.15टक्के
भातसा – 62.12टक्के
विहार – 47.97 टक्के
तुळशी – 48.53 टक्के


