पुणे
Trending

Ajit Pawar : निरोप जनसामान्यांच्या नेत्याला! ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी बारामती दुमदुमली; थोड्याच वेळात ‘अग्निडाग’, सुनेत्रा वहिनींचा शोक अनावर

Ajit Pawar Latest News : तिरंगा ध्वज पुत्र जय पवारांकडे सुपूर्द; अमित शाह आणि राज्य मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अखेरची मानवंदना

बारामती | ज्या हातांनी बारामतीचा कायापालट केला, ज्या मनगटावरील घड्याळाने महाराष्ट्राच्या राजकारणाची वेळ ठरवली, तेच घड्याळ आज त्यांच्या निधनाची साक्ष ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार (वय 66 वर्षे, 6 महिने, 6 दिवस) यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या ऐतिहासिक मैदानावर सध्या जनसागराचा महापूर लोटला असून “अजितदादा परत या, परत या” अशा घोषणांनी आसमंत हेलावून गेला आहे.

घड्याळावरून पटली ओळख; काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण

बुधवारी सकाळी 8.46 वाजता झालेल्या भीषण विमान अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. मात्र, ढिगाऱ्याखाली सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असताना, अजितदादांच्या मनगटातील त्यांच्या प्रसिद्ध घड्याळावरून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख पटवली. ही बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला.

जय पवारांकडे तिरंगा सुपूर्द; कुटुंबियांचा आक्रोश

अंत्यसंस्कारापूर्वी होणाऱ्या शासकीय शिष्टाचाराप्रमाणे, पोलिसांनी अजितदादांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक त्यांचे पुत्र जय पवार यांच्याकडे सुपूर्द केला. हा क्षण अत्यंत भावूक होता. पार्थिव मैदानावर पोहोचताच सुनेत्रा पवार यांना आपला शोक अनावर झाला. यावेळी बहीण सुप्रिया सुळे यांनी त्यांना घट्ट मिठी मारत धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित जनसमुदायही हुंदके देऊन रडताना दिसत होता.

बारामतीकडे येणारे सर्व रस्ते जाम

अजितदादांच्या शेवटच्या दर्शनासाठी त्यांचे समर्थक केवळ गाड्यांनीच नव्हे, तर ट्रॅक्टर आणि पायी देखील बारामतीत दाखल होत आहेत. यामुळे बारामतीला जोडणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0