Prakash Mahajan : “मनसेत दिवाळी… पण माझ्या घरात अंधार!” – प्रवक्ते प्रकाश महाजन यांची खंत उफाळली

Prakash Mahajan On MNS Meeting : इगतपुरी शिबिरात निमंत्रण न मिळाल्याने महाजन नाराज; पक्षात अंतर्गत संवादाचा सूर
नाशिक :- इगतपुरी येथे सुरू असलेल्या मनसेच्या तीन दिवसीय शिबिरात निमंत्रण न मिळाल्याने पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन Prakash Mahajan नाराज झाले आहेत. त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करताना, “मनसेत दिवाळी आहे, पण माझ्या घरात अंधार आहे,” अशा शब्दांत आपली खंत व्यक्त केली आहे.
महाजन यांनी “देव बदलणार नाही, पण देवाने बोलावल्याशिवाय देवळात जाणार नाही,” अशी भूमिका घेत अंतर्गत नाराजीचा आवाज स्पष्ट केला. इतकंच नव्हे, तर “मी इतर कुणावर नाही, तर स्वतःवर नाराज आहे,” असं सांगत त्यांनी आपल्या योगदानाची आठवण करून दिली. “प्रवक्ते म्हणून मी महाराष्ट्र सैनिकांना अभिमान वाटावा असंच काम केलं,” असंही ते म्हणाले.
मनसे-शिवसेना युतीबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडणारे महाजन आणि वैभव खेडकर हे दोघेच शिबिरातून वगळले गेल्याने, त्यामागे ‘राजकीय संकेत’ असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, महाजन यांच्या नाराजीची दखल घेऊन मनसे नेते अमित ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. बुधवारी सकाळी बाळा नांदगावकर यांनीही त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. नांदगावकर यांनी हे शिबिर MMR विभागापुरते मर्यादित असल्याचे स्पष्टीकरण दिले असले, तरी निमंत्रण न मिळाल्यामुळे महाजन यांची झालेली खंत पक्षातील अंतर्गत वातावरणाचे संकेत देऊन जाते.


