
Mumbai Latest MegaBlock Train Update : 9 नोव्हेंबर रोजी देखभालीचे काम; तिन्ही मार्गांवर गाड्या उशिराने, तर हार्बर मार्गावरील सेवा अंशतः रद्द
मुंबई :- रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या अत्यावश्यक देखभालीचे काम करण्यासाठी रविवार, 9 नोव्हेंबर 2025 रोजी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मोठा मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. यामुळे रविवारच्या दिवशी कामासाठी किंवा इतर कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. Mumbai Local Train Update
मध्य रेल्वेवर परिणाम
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 वाजल्यापासून दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि त्यांच्या गंतव्य स्थानावर साधारणतः 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. त्याचप्रमाणे, ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि साधारणतः 15 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावर सेवा रद्द
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या वेळेत ब्लॉक असेल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत सर्व धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गांवर चालवल्या जातील. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्यामुळे या गाड्या विलेपार्ले येथे थांबणार नाहीत. तसेच, जलद मार्गांवर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर येथेही थांबणार नाहीत. यामुळे काही उपनगरीय सेवा रद्द राहतील.
प्रवाशांनी या ब्लॉकच्या वेळापत्रकाची नोंद घेऊनच आपला रविवारी प्रवास सुरू करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


