मुंबई

Mumbai Crime News : जोगेश्वरीत पिस्तुलांसह तरुण गजाआड! उत्तर प्रदेशातून मुंबईत शस्त्र विक्रीचा कट उधळला

गुन्हे शाखेच्या सापळ्यात दोन पिस्तुले व चार जिवंत काडतुसे जप्त

मुंबई | जोगेश्वरी पूर्वेतील जेव्हीएलआर मार्गावर दत्त मंदिरासमोर रचलेल्या सापळ्यात गुन्हे शाखेच्या कक्ष-10 ने एक धक्कादायक कारवाई करत देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. आरोपी रोहित रामगणेश यादव (वय 23) हा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रहिवासी असून, तो मुंबईत शस्त्र विक्रीसाठी आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विशेष माहितीच्या आधारे पोलिसांनी जेव्हा परिसरात संशयित हालचाल करणाऱ्या तरुणाला अडवले, तेव्हा सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याच्याकडील बॅगेची झडती घेतल्यावर पोलिसांनाही धक्का बसला — बॅगेत दोन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे सापडली. यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आणि मेघवाडी पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकारामागे आंतरराज्यीय अवैध शस्त्र तस्करी रॅकेटचा संभाव्य हात असल्याचा पोलिसांना संशय असून, याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आदी राज्यांत अवैध शस्त्र तयार करणाऱ्या टोळ्यांचे जाळे कार्यरत असून, गेल्या तीन वर्षांत एक लाखांहून अधिक शस्त्रे जप्त झाल्याची अधिकृत नोंद आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईत शस्त्र विक्रीसाठी आलेला तरुण पकडला जाणे हे शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची घंटा मानली जात आहे. या टोळ्यांचा थेट संबंध अन्य गंभीर गुन्ह्यांशी असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा तपास यंत्रणांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0