मुंबई

Mumbai Rain Update : कोकण-विदर्भात पावसाचा गडगडाट!

•रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई :- राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून, पुढील काही दिवस राज्यावर पावसाचे सावट राहणार आहे. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आणि तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे, नाशिक घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत अनेक भागात पावसाचा जोर सोमवारी सकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंत मुरुडमध्ये 108 मिमी, कुडाळमध्ये 104 मिमी, सोनपेठमध्ये 175 मिमी, म्हसळ्यात 80 मिमी, सावंतवाडीत 98 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील अनेक भागांनाही दमदार पावसाने झोडपले असून, कृषी पिकांसाठी ही बाब फायदेशीर ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई व उपनगरांत सोमवारीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. विशेषतः उपनगरांत पावसाचा जोर अधिक आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. कुलाबा केंद्रात मंगळवारी 27.6 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 30.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अतिमुसळधार पाऊस :- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा

मुसळधार पाऊस :- मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा

विजांच्या कडकडाटासह पाऊस :- विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्हे

vivek

Recent Posts