Maharashtra News : “शासन भिकारी आहे, शेतकरी नाही!” – कोकाटेंच्या वादग्रस्त विधानावरून राजकारण तापलं, फडणवीसांचाही संताप

Manikrao Kokate News : रमी गेम प्रकरणावरून माणिकराव कोकाटे बचावाच्या मोडमध्ये, पण नव्या विधानाने पेटली वादाची नवी ठिणगी
मुंबई :- राज्याच्या विधिमंडळात चालू अधिवेशनात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate आता आणखी एका नव्या वादात सापडले आहेत. सभागृहात लक्षवेधी सुरु असताना कथितपणे मोबाईलवर रम्मी खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटेंवर राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना, त्यांनी आज (22 जुलै) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. मात्र, या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेलं “शासन भिकारी आहे, शेतकरी नाही” हे वक्तव्य नव्या वादाला तोंड फोडणारं ठरत आहे. Maharashtra News
कोकाटे म्हणाले काय?
“शासन एक रुपया घेतं, पण देत नाही. म्हणजे भिकारी कोण? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही,” असं वक्तव्य करताना कोकाटेंनी पुन्हा एकदा स्फोटक भाष्य केलं. याचवेळी त्यांनी पिकविमा योजनेचा गैरवापर झाल्याचा दावा करत, “माझ्याच कार्यकाळात साडेपाच लाख बोगस अर्ज आले. आम्ही ते रद्द केले,” असंही सांगितलं.
मोबाईलवर रम्मी खेळल्याच्या आरोपांवर बोलताना कोकाटे म्हणाले, “मी रम्मी खेळलोच नाही. व्हिडीओ एडिट केलेला आहे. आणि राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही.” त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत, “हे सगळं माझ्या बदनामीसाठी केलं जातं आहे. मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही,” असाही इशारा दिला.
कोकाटेंच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत सांगितलं, “मी विधान ऐकलं नाही, पण जर असं वक्तव्य झालं असेल, तर ते पूर्णतः अयोग्य आहे. कोणत्याही मंत्र्याने अशी भाषा वापरू नये.”
एका बाजूला ऑनलाइन रम्मी खेळल्याचा आरोप, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान, आणि आता स्वतःच्याच कार्यकाळात लाखोंच्या बनावट अर्जांचा स्वीकार… माणिकराव कोकाटेंभोवती वादांची मालिका उभी राहत असून विरोधक राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.
राजकारणात ‘एक रुपया’ कधी मोठा ठरतो, तर कधी ‘मोबाईल स्क्रीन’ सरकार हलवते. माणिकराव कोकाटेंच्या विधानांनी आता केवळ विरोधकच नव्हे, तर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचाही संयम चाचपायला सुरुवात केली आहे. या वादांची परिणती राजीनाम्यात होते की पक्षांतर्गत कारवाईत – हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


