Maharashtra Cabinet Meeting : शक्तिपीठ महामार्ग, कोयना प्रकल्प, नागरी पायाभूत सुविधा… मंत्रिमंडळाच्या निर्णयांनी प्रगतीचा वेग वाढणार

Maharashtra Cabinet Meeting Latest News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये दुपटीने वाढ; शिक्षणाचा आधार आता अधिक भक्कम
मुंबई | राज्य मंत्रिमंडळाच्या Maharashtra Cabinet Meeting आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली अनेक जनहिताचे आणि भव्य पायाभूत प्रकल्पांचे निर्णय घेण्यात आले. यात विशेषत्वाने आदिवासी विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता आणि शैक्षणिक मदतीत झालेली वाढ, तसेच महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद यांचा समावेश होता.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय क्रांतिकारक ठरणार आहे. दरमहा दिला जाणारा आहार व निर्वाह भत्ता तब्बल दुपटीने वाढवण्यात आला आहे, तर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठीही भरीव आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामुळे वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न अधिक गतिमान होईल.
दुसरीकडे, वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून सिंधुदुर्गातील पत्रादेवीपर्यंत जाणाऱ्या 805 किमीच्या ‘शक्तिपीठ महामार्ग’ प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग आणि 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग सहा पदरी असणार आहे. यासाठी भूसंपादनासह आखणीस मंजूर करण्यात आलेली 20 हजार कोटी रुपयांची तरतूद हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
याच बैठकीत छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी 822 कोटींचा निधी, नागपूरच्या मलनिःसारण प्रकल्पासाठी 268 कोटी, तर मिरा-भाईंदर महापालिकेसाठी 116 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या 2 हजार कोटींच्या कर्जावर शासन हमी देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
याशिवाय, कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहास सुधारित प्रशासकीय मान्यता, महाराष्ट्र GST अधिनियमात सुधारणा, तसेच सार्वजनिक कंपन्यांच्या थकबाकी वसुलीसाठी सुधारणा विधेयक आणण्याचेही संकेत मंत्रिमंडळ बैठकीतून मिळाले आहेत.


