मुंबई

Mumbai Rain Update : मुंबईला जुलैमध्येही पावसाची ओढ!,मुसळधाराऐवजी रिपरिपचं पाऊस

•सरासरीच्या तुलनेत पावसाची मात्रा कमी; नागरिकांत चिंता

मुंबई | राजधानी मुंबईत जुलै महिना मध्यावर आला असतानाही पावसाने अजूनही फारशी दाद दिलेली नाही. सोमवारी सकाळपासून शहरात हलक्या सरी पडल्या, पण मुसळधार पावसाचा मागमूसही नव्हता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘रिपरिप’मुळे हवामानात गारवा जाणवतोय, पण जुलै महिन्याच्या सरासरीला गाठण्याच्या दृष्टीने हा पाऊस अद्याप अपुरा आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारपासून पुढील 3-4 दिवस कोकणसह राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. मुंबईत अधूनमधून हलक्या सरी पडतील, पण मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पावसाचा आकडा सरासरीपासून दूर
1 ते 14 जुलै या काळात कुलाबा वेधशाळेत 123.6 मिमी तर सांताक्रूझ येथे 189.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, जुलै महिन्याची सामान्य सरासरी अनुक्रमे 734.1 मिमी (कुलाबा) आणि 855.7 मिमी (सांताक्रूझ) इतकी असते. त्यामुळे नागरिकांमध्ये हा प्रश्न सतावतोय – ‘या वर्षी जुलैला खरंच पावसाळा विसरला आहे का?’

राज्यात कुठे ढगांचा कडकडाट, कुठे थोडा पाऊस राज्यात यंदा सुरुवातीला दमदार पावसाने दम दाखवला होता, विशेषतः विदर्भात. मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. कोकणात फक्त हलक्या सरींचा अंदाज आहे. धुळे, नंदूरबार भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे, तर भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.

दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर आणि वायव्य मध्यप्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं आहे. समुद्र सपाटीपासून 7.6 किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत, मात्र या प्रणालीची तीव्रता वाढण्याच्या स्थितीत असूनही, मुंबईसाठी त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0