Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी; पुढील काही तासांत पावसाचा तीव्र वाढीचा इशारा

•नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
मुंबई | मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नरिमन पॉइंट, दादर, वरळी, परळ, शीव, कुर्ला तसेच घाटकोपर, पवई आणि भांडूप यांसह अनेक भागांत गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमीपर्यंत वाढू शकतो. मुसळधार पावसामुळे चर्चगेट, परळ, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल आणि फोर्ट या भागांत पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नरिमन पॉइंट, दादर, वरळीसह अनेक भागात गडगडाटासह जोरदार पाऊस
हवामान खात्याने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.नवी मुंबईसह रायगड जिल्ह्याला देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नेरुळ, वाशी, बेलापूर या भागांतही जोरदार पावसाचे पूरक वातावरण आहे.
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी या आठवडाभरापासून वेग कमी केला असून, मुंबईसह इतर भागांतील मोसमी पावसाची पुढील वाटचाल थोडी मंदावलेली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पावसाची तीव्रता आणि काळजी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.


