Mumbai Rain Update : पावसाचा तडाखा! राज्यभर मुसळधार, पालघर रेड अलर्टवर – मुंबई, विदर्भातही धोक्याची घंटा

•सावित्री नदीची पाणीपातळी वाढली; रायगडच्या दोन तालुक्यांतील शाळांना सुट्टी
मुंबई :- राज्यात परत एकदा पावसाने तडाखा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 जुलै रोजी महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार पावसाचा जोर दिसून आला. कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच विदर्भ या तिन्ही भागांमध्ये पावसाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतोय.मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः मुंबईत ढगाळ वातावरण असून समुद्रात उंच लाटांचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. शहरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारनंतर जोरदार सरी कोसळू शकतात.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामागचं कारण म्हणजे महाबळेश्वर परिसरात झालेल्या रात्रीच्या मुसळधार पावसानंतर सावित्री नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून इशारा पातळी ओलांडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विदर्भातही पावसाचा जोर कमी नाही. चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत नदी-नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीची पातळी वाढली आहे.
पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा कहर कायम आहे. सलग पावसामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. परिणामी, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शेतीच्या कामांना वेग आला असला तरी पाण्याच्या प्रमाणामुळे काही भागांत अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
एकंदरीत, संपूर्ण राज्यात पावसाचे चित्र गंभीर आहे. नदीपात्रं भरत चालली आहेत, धरणांमधून विसर्ग वाढतोय, आणि शाळा बंद ठेवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. पुढील काही तास राज्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.


