Mumbai Rain : मुंबईत पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता, या भागात इशारा देण्यात आला आहे
•मुंबईतील नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई :- उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना या महिन्यात पावसाने दिलासा दिला आहे. जुलैच्या पहिल्या चार दिवसांत चांगला पाऊस झाला असून, शुक्रवारीही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज सकाळपासून पाऊस पडत आहे, अद्याप जोरदार पाऊस झाला नसला तरी येत्या काही तासांत परिस्थिती बदलू शकते.
गुरुवारी कुलाबा येथे 0.8 मिमी तर सांताक्रूझ येथे 2.1 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, शुक्रवारी अनुकूल हवामानामुळे मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
शुक्रवारी मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे आणि कोल्हापूर परिसरातही मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जुलैमध्ये सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पाऊस अपेक्षित आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, 5 जुलै ते 10 जुलै या कालावधीत राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. या काळात पावसाचा जोर जास्त असू शकतो म्हणून त्यांनी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.