Malegaon News Update : मालेगाव स्फोट : 17 वर्षांनंतर ‘भगवा दहशतवादा’चा आरोप फोल ठरला!

•देर आये दुरुस्त आये! कोर्टाच्या निकालाने ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग करणाऱ्यांना सणसणीत चपराक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणावर आज मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने अंतिम शिक्कामोर्तब केले. तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, या प्रकरणातील सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. “केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही,” असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा निकाल दिला. या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांनी जीव गमावला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या निकालामुळे अनेक कुटुंबांना न्याय मिळाल्याची भावना असली तरी, प्रदीर्घ कालावधी लागल्याने ‘न्याय मिळण्यास उशीर’ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर त्यांनी म्हटले आहे की, “दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार.” काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना फडणवीस म्हणाले, “त्यावेळी देशात यूपीएचे सरकार होते आणि मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट होत होते. त्यावेळी यूपीए सरकारचे म्हणणे होते की, दहशतवादाला कुठलाही रंग नसतो. परंतु, मालेगावचा स्फोट झाला, तेव्हा त्यांनी त्याला ‘भगवा दहशतवाद’ म्हटले आणि राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आजच्या निकालामुळे त्यावेळेस केलेल्या राजकारणाला कोर्टाने सणसणीत चपराक दिली आहे.”


