Mumbai Political News : महायुतीत बिघाडी! राज्यातील 14 महापालिकांमध्ये भाजप-शिंदे गट स्वतंत्र; मुंबई-ठाण्यात मात्र अजित पवार ‘आऊट’

•पुणे, नाशिक, संभाजीनगरसह प्रमुख शहरांत युतीची शकले; 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला लागणार निकाल
मुंबई | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासांत महायुतीमध्ये मोठा विसंवाद पाहायला मिळाला. जागावाटपाचा तिढा न सुटल्याने आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याने भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी 14 महत्त्वाच्या शहरांमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या शहरांमध्ये आता महायुतीच्या घटक पक्षांमध्येच थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे.
या 14 शहरांमध्ये युती तुटली
जागावाटपात तडजोड करण्यास दोन्ही पक्षांनी नकार दिल्यामुळे खालील शहरांमध्ये आता भाजप आणि शिंदे गट समोरासमोर असतील.
पुणे व पिंपरी-चिंचवड
नाशिक व मालेगाव
छत्रपती संभाजीनगर व जालना
नवी मुंबई, मीरा-भाईंदर व उल्हासनगर
अकोला, अमरावती, नांदेड, धुळे आणि सांगली
मुंबई आणि ठाण्यात अजित पवार ‘युती’बाहेर
राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई (BMC) आणि ठाण्यात (TMC) भाजप आणि शिंदे गटाने आपली युती कायम ठेवली आहे. मात्र, येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला युतीपासून दूर ठेवण्यात आले आहे. मुंबईत भाजपने 137 तर शिवसेनेने 90 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार गट आता मुंबईत स्वतंत्रपणे आपले उमेदवार उतरवत असल्याने येथे तिरंगी लढत पाहायला मिळेल.
नाराजी आणि बंडखोरीचा फटका
अनेक ठिकाणी ‘आयाराम’ नेत्यांना झुकते माप दिल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी एबी फॉर्मसाठी नेत्यांच्या गाड्यांचा पाठलाग केला, तर संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्याने एका महिला पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या अंतर्गत बंडाळीचा फटका सर्वच प्रमुख पक्षांना बसण्याची शक्यता आहे.
निवडणूक कार्यक्रम एका दृष्टिक्षेपात
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 डिसेंबर 2025 (आज)
अर्जांची छाननी: 31 डिसेंबर 2024
अर्ज माघारी घेण्याची मुदत: 2 जानेवारी 2026
मतदान तारीख: 15 जानेवारी 2026
निकाल: 16 जानेवारी 2026


