Sharad Pawar : शरद पवारांना ‘चेस्ट इन्फेक्शन’; पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू, प्रकृती स्थिर

Sharad Pawar Health Update : अजित पवारांच्या निधनाचा धक्का आणि धावपळीमुळे प्रकृतीवर परिणाम; सुप्रिया सुळे आणि रोहित पवार रुग्णालयात हजर
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती आज अचानक खालावल्याने त्यांना बारामतीहून तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात करण्यात आलेल्या प्राथमिक चाचण्या आणि ‘सिटी स्कॅन’मध्ये त्यांना ‘चेस्ट इन्फेक्शन’ (छातीत संसर्ग) झाल्याचे निदान झाले आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
व्हीलचेअर आणि ऑक्सिजन मास्कचा आधार दुपारी रुग्णालयात आणले असताना शरद पवार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार व्हिलचेअरवरून नेण्यात आले आणि काही काळ ऑक्सिजन मास्कही लावण्यात आला होता. 85 वर्षीय पवारांना वाढत्या वयानुसार होणारा थकवा आणि गेल्या काही दिवसांतील मानसिक ताणामुळे हा त्रास उद्भवल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर प्रकृतीत चढ-उतार 28 जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे शरद पवार यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या दुःखद घटनेनंतर सांत्वनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी आणि सततच्या धावपळीमुळे त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. आज बारामतीत अजितदादांचा ‘तेरावा’ विधी सुरू असतानाच शरद पवारांना खोकल्याचा त्रास वाढल्याने त्यांना तातडीने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुप्रिया सुळेंचे डॉक्टरांना खास आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून उपचारांची माहिती घेतली. त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “तुम्ही म्हणाल तसं आम्ही सगळं करू, डॉक्टरांचे सजेशन आमच्यासाठी अंतिम असेल.” तसेच रुग्णालयात गर्दी होऊ नये यासाठी कोणत्याही व्हिजीटर्सना प्रवेश देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
डॉक्टरांचे ‘मेडिकल बुलेटिन’ लवकरच रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट आणि डॉ. अभिजित लोढा त्यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांच्या मते, “शरद पवार सध्या आयसीयूमध्ये नसून नॉर्मल रूममध्ये आहेत. त्यांना 24 तास निरीक्षणाखाली ठेवले जाईल आणि त्यानंतरच डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाईल.”



