Mumbai Police News : मुंबई पोलिसांचा ‘चर्शी बाबा’वर दणका! 70 वर्षीय ड्रग्ज तस्कराला ‘PIT-NDPS’ अंतर्गत संभाजीनगर कारागृहात धाडले

Mumbai Police Latest Crime News : 10 वर्षांची शिक्षा भोगून आल्यावरही सुरूच होता गोरखधंदा; मुंबईत 7 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत तस्कराची रवानगी तुरुंगात
मुंबई | मुंबईतील अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) सराईत ड्रग्ज तस्कर इर्शाद सरदार खान उर्फ ‘चर्शी बाबा’ (वय 70) याच्यावर ‘PIT-NDPS’ कायद्यांतर्गत मोठी कारवाई केली आहे. या सराईत तस्कराची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेसाठी करण्यात आली आहे. Mumbai Police latest News
काय आहे ‘चर्शी बाबा’चा काळा इतिहास?
माझगाव मधील रे रोड परिसरातील ‘बाबा का ढाबा’ चालवणारा इर्शाद खान हा अंमली पदार्थांच्या जगतातील जुना खेळाडू आहे. त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षात चरस, गांजा आणि कोकेन तस्करीचे तब्बल 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, 2008 मधील एका गुन्ह्यात त्याला 10 वर्षांची कैद आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा झाली होती. मात्र, कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपला ड्रग्जचा व्यवसाय सुरू केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कठोर ‘PIT-NDPS’ कायद्याचा बडगा आझाद मैदान युनिटने 2025 मध्ये त्याच्यावर केलेल्या कारवाईनंतर, पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी अशा सराईत गुन्हेगारावर केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर त्याला स्थानबद्ध करणे गरजेचे असल्याचे ओळखून गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर, 21 जानेवारी 2026 रोजी त्याला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर कारागृहात हलवण्यात आले आहे.
पोलिस दलाची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम आणि अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर, आझाद मैदान युनिटचे पोलीस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी, सुवर्णा अडसुळे, सरिता गावडे आणि त्यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली.



