Mumbai Police : मुंबई पोलिसांची दिवाळी भेट! परिमंडळ 8 कडून 1.66 कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

Mumbai Police Diwali Gift : चोरीच्या 237 वस्तू मूळ मालकांना सुपूर्द; आनंदित नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार
मुंबई :- दिवाळी तोंडावर असतानाच मुंबई पोलिसांनी नागरिकांना एक खास भेट दिली आहे. मुंबई पोलीस दलाच्या परिमंडळ 8 अंतर्गत येणाऱ्या सात पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला आणि गहाळ झालेला तब्बल 1 कोटी 66 लाख 46 हजार 211 रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे. Mumbai Police Latest Crime News
यासाठी सोमवारी (13 ऑक्टोबर 2025) बीकेसी पोलीस ठाण्यातील ‘पासयदान हॉल’ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
237 वस्तू मूळ मालकांना परत
परिमंडळ 8 अंतर्गत बीकेसी, खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला, विलेपार्ले, सहार आणि विमानतळ या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, चोरी आणि मोटार वाहन चोरी यांसारख्या मालमत्ताविषयक गुन्ह्यांमध्ये ही मालमत्ता हस्तगत करण्यात आली होती.
पोलिसांनी एकूण 237 वस्तू मूळ मालकांना परत केल्या. या मुद्देमालात मौल्यवान दागिने, मोटार वाहने, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, CEIR प्रणालीचा (Central Equipment Identity Register) वापर करून तांत्रिक तपास करत पोलिसांनी गहाळ झालेले 202 मोबाईल फोन परत मिळवले आहेत.
मालकांनी व्यक्त केला आनंद
परिमंडळ-8 चे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या हस्ते आणि सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत हा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.
गुन्ह्यात गमावलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी यावेळी मोठा आनंद व्यक्त केला आणि मुंबई पोलिसांचे विशेष आभार मानले. मुंबई पोलीस नागरिकांची मालमत्ता शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे. Mumbai Police Latest Crime News


