
Aaditya Thackeray On Illegal Bangladeshi People : मुंबईच्या मूळ प्रश्नांकडे वेधलं लक्ष
मुंबई :- मुंबईतील नागरी समस्या प्रलंबित असताना सरकारचं आणि महापौरांचं लक्ष केवळ बांगलादेशी घुसखोरीवर केंद्रित असल्याबद्दल आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून भाजपला काही मूलभूत प्रश्न विचारले आहेत. मुंबईत सध्या खड्डे, कचरा व्यवस्थापन, अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ आणि वाढतं प्रदूषण हे गंभीर प्रश्न आहेत. या प्रश्नांवर काम करण्याऐवजी घुसखोरीच्या मुद्द्याचं राजकारण केलं जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.
आदित्य ठाकरे यांनी नवनिर्वाचित महापौर यांच्या वर निशाणा साधताना विचारलं की, “नवनिर्वाचित महापौरांना आता एकच प्रश्न सतावतोय बांगलादेशी घुसखोरांचा! चांगलं आहे पण मुंबईतील नागरी प्रश्नांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होतेय; खोदून ठेवलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, प्रदूषित पाणी आणि हवा…
बरं, पण हा विषय केंद्र आणि राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. कदाचित महापौरांना वाटत असेल ही खाती आपल्याकडेच आहेत!
भाजपने ह्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत:
जर हे खरे असेल, तर बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसले?
ते भारताच्या एका टोकापासून भाजपशासित राज्यांतून मजलदरमजल करीत मुंबईत कसे काय येऊ शकले?
इतकी वर्षे ते इथे कसे काय राहिले? केंद्रात तर दशकभरापासून भाजपचे सरकार आहे!
ह्या राष्ट्रीय सुरक्षेतील अपयशासाठी जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचे अपयश? की प्रशासकीय अपयश?
उत्तर एकच, भाजप!
जे प्रत्येक निवडणुकीत सांगतात कि ते POK घेणार, ते आता बांगलादेशी घुसले कसे ह्याचे उत्तर देऊ शकत नाही. पण प्रत्येक अपयशाचा इव्हेन्ट कसा करायचा, हे ह्या भाजपकडून शिकायचे!
जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर शिरले असतील, तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात अपयश आले; हे केंद्र व राज्य सरकारने का लपवले?
ह्यातून एकच सिद्ध होते की राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे!


