Maharashtra Political Update : ‘मराठी’च्या मंचावर सत्तेचा समीकरणांचा रंग! राज-उद्धव एकत्र आल्यावर युतीचे वारे जोरात

Raj Thackeray On MNS Shivsena Yuti : विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरे एकत्र; उद्धव ठाकरेंची सकारात्मकता स्पष्ट – मात्र राज ठाकरेंचा अद्याप ‘थांबा आणि पाहा’चा सूर
मुंबई :- राज्याच्या राजकारणात एक मोठी राजकीय हालचाल घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे नुकत्याच पार पडलेल्या ‘मराठी विजयी मेळावा’ या कार्यक्रमात एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात नवेच वारे वाहू लागले आहेत.
कार्यक्रमाच्या निमित्ताने जरी हा मंच ‘मराठी अस्मिता’च्या मुद्द्यावर आधारित होता, तरी दोन्ही नेत्यांची उपस्थिती ही भावी युतीच्या चर्चांना गती देणारी ठरली आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे स्पष्ट संकेत दिले.
मात्र, राज ठाकरे यांनी या संभाव्य युतीविषयी अद्यापही आपला नेहमीचा सावध आणि सुस्पष्ट पवित्रा कायम ठेवला आहे. “हा मेळावा मराठी भाषेच्या प्रश्नावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध जोडणे चुकीचे आहे,” असे ते अनौपचारिक चर्चेत म्हणाले होते.
त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे स्वतःची भूमिका स्पष्ट करत पुन्हा एकदा संभाव्य युतीबाबत भ्रम दूर केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना अजूनच धार चढली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज-उद्धव युती खरंच घडेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
सस्नेह जय महाराष्ट्र,
14 आणि 15 जुलै 2025 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं.
त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाईम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा!
नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल!
पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा 1984 पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे, पत्रकारिता ही मी खुप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका.
मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन !
आपला
। राज ठाकरे


