
NCP Leader Rupali Thombare : अजित पवारांकडे सुपूर्द केला राजीनामा; रुपाली चाकणकर यांच्याशी थेट ‘ख्वाडा’ वादाची चर्चा
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आक्रमक नेत्या आणि पुणे शहर कार्याध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे Rupali Thombare यांनी पक्षातील वाढत्या नाराजीमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट पक्षश्रेष्ठी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पक्षातून बाहेर पडण्याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचे रुपाली पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
माजी नगरसेविका असलेल्या रुपाली पाटील यांनी 2021 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
‘रुपाली विरुद्ध रुपाली’ वाद
रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यामागे पक्षांतर्गत वाद हे प्रमुख कारण मानले जात आहे. विशेषतः, राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यातील अंतर्गत वाद काही दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आले होते.
‘ख्वाडा’ इशारा: बीडमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात न्याय न मिळाल्याचा दावा करत रुपाली पाटील यांनी आवाज उठवला होता. त्यावेळी त्यांनी, “आमचा इतिहास अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, तर गरज पडल्यास ‘ख्वाडा’ करणाऱ्यांचा आहे,” असा इशारा रूपाली चाकणकर यांना दिला होता.
प्रचारक आणि प्रवक्त्यांच्या यादीतून डच्चू
रुपाली पाटील यांना पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही वगळण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत रुपाली पाटील यांना स्थान मिळाले नव्हते, तसेच त्यांना प्रवक्त्यांच्या यादीतूनही यापूर्वीच वगळण्यात आले होते. त्यामुळे त्यांची पक्षातून गच्छंती निश्चित मानली जात होती.
दरम्यान, नुकतीच रुपाली पाटील यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट राजकीय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, आता राजीनामा दिल्यानंतर त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


