Mumbai Police : पोलिसांच्या तत्परतेमुळे 6 विद्यार्थ्यां सुखरूप! माटुंगा येथे शाळेची बस पाण्यात बंद पडली; पोलिसांनी मुलांना खाऊ देऊन पोलीस ठाण्यात आणले

Mumbai Police Latest News : दादर, हिंदमाता, अंधेरीमध्ये गुडघाभर पाणी; मुंबईतील वाहतूक पूर्णपणे ठप्प

मुंबई :- मुंबईत गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून, याचा फटका सामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही बसत आहे. अशाच एका घटनेत, माटुंगा येथे पाण्यात बंद पडलेल्या शाळेच्या बसमधील 6 विद्यार्थ्यांना पोलिसांनी तात्काळ मदत करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.

माटुंगा पोलिसांची तत्परता

डॉन बॉस्को शाळेतील मुलांना घेऊन जाणारी बस प्रतीक्षा नगर येथे जात असताना, माटुंगा परिसरातील किंग्ज सर्कल येथे साचलेल्या पाण्यात बंद पडली. या भागात दीड ते दोन फूट पाणी साचले होते. संभाव्य धोका लक्षात घेता माटुंगा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील सहा विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणले. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी मुलांना खाऊ देऊन त्यांच्याशी संवाद साधला, ज्यामुळे भीतीचे वातावरण दूर झाले. पोलिसांच्या या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक दोन्हीवर मोठा परिणाम झाला आहे. किंग्ज सर्कल, हिंदमाता, माटुंगा, दादर टी.टी., भोईवाडा, जुहू गल्ली, वाकोला आणि अंधेरी यांसारख्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी नाका, वांद्रे, जे.जे. पूल, हिंदमाता यांसारख्या प्रमुख मार्गांवर वाहतूक मंद गतीने सुरू आहे. तसेच, अंधेरी भुयारी मार्गावरही पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

vivek

Recent Posts