Mumbai News : मुंबईत दोन दिवसांत दोन तरुण बुडाले, पोहता न येण्याचा निष्काळजीपणा ठरला जीवावर

•बोरिवलीत तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत; जुहू समुद्रातही एका तरुणाचा बुडून मृत्यू
मुंबई :- गेल्या दोन दिवसांत मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बुडण्याच्या घटनांमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पोहता न येणाऱ्या तरुणांनी पाण्यात उतरण्याचा घेतलेला धोका त्यांच्या जीवावर बेतला आहे. बोरिवली येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई तलावात एक 18 वर्षीय युवक बुडाल्याची घटना रविवारी घडली, तर शुक्रवारी जुहू समुद्रकिनाऱ्यावर बुडलेल्या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह शोध मोहिमेनंतर सापडला.
बोरिवलीत तलावात बुडून मृत्यू
बोरिवलीतील न्यू लिंक रोडवरील झाशीची राणी लक्ष्मीबाई तलावात रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोहम्मद अल्ताफ शरीफ शेख (18 वय) हा युवक बुडाला. त्याला पोहता येत नव्हते, तरीही तो पाण्यात उतरला. पाण्यात पडल्यानंतर बाहेर येण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले, मात्र तो यशस्वी झाला नाही. एका मच्छीमाराच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्याने तात्काळ पाण्यात उतरून अल्ताफला बाहेर काढले. त्याला जवळच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जुहू समुद्रातही दुर्दैवी घटना
याच आठवड्यात, शुक्रवारी जुहू येथील समुद्रकिनाऱ्यावरील गोदरेज गेट परिसरात दोन तरुण पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागले. समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांनी तातडीने एका तरुणाला वाचवले, मात्र विघ्नेश देवेंद्रन (20 वय) हा बेपत्ता झाला होता. अग्निशमन दलाने शोधमोहिम राबवल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले.


