मुंबईठाणे
Trending

Mumbai News : मुंबईत लवकरच ‘पाताल लोक’ साकारणार!

Devendra Fadnavis On Mumbai City : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; भूमिगत मार्गांचे जाळे तयार होणार, 80 किमी प्रति तास वेगाने धावणार मुंबईकरांची वाहने!

मुंबई :- वाहतूक कोंडी ही मुंबईकरांची मोठी समस्या असून, या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी राज्य सरकार विविध रस्ते आणि भुयारी मार्गांचे जाळे तयार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपच्या ‘युथ कनेक्ट’ मोहिमेअंतर्गत वरळीतील एनएससीआय डोम येथे तरुणांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, “आम्ही मुंबईत ‘पाताल लोक’ तयार करत आहोत. हे ‘पाताल लोक’ तयार झाल्यानंतर मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका होईल.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाचा आणि वाहतूक समस्येवरच्या उपायांचा रोडमॅपच यावेळी स्पष्ट केला.

सरासरी वेग वाढवण्याचे आव्हान
मुख्यमंत्री म्हणाले, “60 टक्के मुंबई ही पश्चिम द्रुतगती महामार्गावरून धावते. त्यावरील भार कमी होत नाही तोवर मुंबईला कोणीच वाहतूक कोंडीतून बाहेर काढू शकणार नाही.” सध्या मुंबईचा सरासरी वेग 20 किमी प्रतितास इतका असून, सकाळी व संध्याकाळी तो 15 किमी प्रतितास इतका कमी होतो. हा वेग वाढवण्यासाठी, “आम्ही असे रस्ते बांधत आहोत जिथे तुम्ही 80 किमी प्रति तास इतक्या वेगाने वाहने चालवू शकाल. 80 पेक्षा कमी वेग चालणार नाही, ज्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल.”

महत्त्वाचे भुयारी आणि समांतर मार्ग
मुंबईची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली:

ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग: तसेच, मुलुंड-गोरेगाव असा आणखी एक भुयारी मार्ग बांधला जाईल. यामुळे मुंबईची पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुलभ होईल.

पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर रस्ता: बोरीवली ते गोरेगावदरम्यान आणखी एक रस्ता बांधण्यात येत आहे.

वरळी-शिवडी पूल: अटल सेतूला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी असा पूल बांधत आहोत. यामुळे उपनगरांमधील लोक कोस्टल रोडने थेट नवी मुंबई विमानतळावर पोहोचतील.

ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार: ईस्टर्न फ्रीवे जिथे संपतो तिथून पुढे वाहतूक कोंडी संपवण्यासाठी भुयारी मार्ग चौपाटीपर्यंत नेण्यात येईल. याचे काम सुरू झाले असून, तीन वर्षांत ते पूर्ण होईल.

वांद्रे-बीकेसी-विमानतळ कनेक्टिव्हिटी: वांद्रे-वरळी सी लिंकने वांद्रे येथे पोहोचल्यावर तिथून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी आणि पुढे विमानतळापर्यंत नेण्यासाठी आणखी एक भुयारी मार्ग विकसित केला जात आहे. यामुळे दक्षिण मुंबईहून विमानतळावर पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त 20 मिनिटे लागतील.

2023 पर्यंत मुंबई कोंडीमुक्त
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “आम्ही मुंबईत भूयारी मार्गांचे जाळे तयार करत आहोत. वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांना समांतर रस्ते आणि भुयारी मार्ग तयार केले जातील, ज्यामुळे मुंबई वाहतूक कोंडीमुक्त होईल.” मेट्रो व रेल्वेचे काम दरवर्षी 50 किलोमीटर पुढे नेले जाईल. काही प्रकल्प थोडे पुढे जातील, मात्र 2023 पर्यंत सगळे प्रकल्प मार्गी लागतील आणि मुंबई सर्व प्रकारच्या कोंडीतून मुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0