Mumbai News : सरदार पटेलांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मुंबईत ‘राष्ट्रीय एकता दिना’चा जागर; बृहन्मुंबई पोलिसांकडून ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन

•पोलीस आयुक्त, सेलिब्रिटी आणि 27 हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग; शहरात 98 ठिकाणी एकतेची दौड
मुंबई :- भारताचे लोहपुरुष ‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त, देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याच्या उद्देशाने, देशभरात 34 ऑक्टोबर 2025 रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात बृहन्मुंबई पोलीस दलाने ‘रन फॉर युनिटी’ (Run for Unity) या भव्य उपक्रमाचे आयोजन केले होते.
शपथग्रहण आणि भव्य दौड
बृहन्मुंबई पोलीस दलांतर्गत सकाळी 11.00 वाजता ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करण्यासाठी शपथग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय, बृहन्मुंबई पोलीस अंतर्गत असलेल्या 93 पोलीस ठाण्यांमध्ये आणि 5 सशस्त्र पोलीस दलांतर्गत ‘रन फॉर युनिटी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
सहभाग: या उपक्रमात पोलीस आयुक्त, इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, ख्यातनाम व्यक्ती (खेळाडू, सिने कलाकार, इ.), शांतता समिती सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक अशा मोठ्या जनसमुदायाने सहभाग घेतला.
ठिकाणे: ‘रन फॉर युनिटी’ उपक्रमाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई पोलीस दलांतर्गत 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 :00 वाजता 98 ठिकाणी 1 ते 5 किलोमीटरच्या दौडचे आयोजन करण्यात आले.
सुरक्षा व्यवस्था: दौडीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि जनजागृतीसाठी ‘स्टार्टिंग पॉईंट’ आणि ‘एंड पॉईंट’वर बॅनर्स लावण्यात आले होते.
सदर आयोजित उपक्रमामध्ये पोलीस आयुक्तांसह एकूण 11,459 पोलीस अधिकारी व अंमलदार आणि एकूण 158 ख्यातनाम व्यक्ती व प्रतिष्ठित नागरिक अशा एकूण 27,553 लोकांनी सक्रीय सहभाग घेतला, ज्यामुळे ‘राष्ट्रीय एकता दिना’चा संदेश मुंबई शहरात प्रभावीपणे पोहोचला.


