•चार ठिकाणी छापेमारी; हवाला ऑपरेटरच्या सहभागाची माहिती हाती
मुंबई : डब्बा ट्रेडिंग मोबाइल अॅप प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुंबईत चार ठिकाणी धडक कारवाई करत सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांची रोकड, परदेशी चलन, महागड्या मोटरगाड्या, दागिने व पैसे मोजण्याची यंत्रे असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात हवाला ऑपरेटरचा सहभाग स्पष्ट होत असून, डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा संशय आहे.
ही कारवाई इंदूर येथील लसुदिया पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आली. सहा मोबाइल डब्बा ट्रेडिंग अॅप्सच्या माध्यमातून बेकायदेशीर शेअर ट्रेडिंग सुरू होते. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे स्पष्ट संकेत मिळाले असून, सट्टेबाज व पंटर यांचा सहभाग असलेल्या संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू आहे.
डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय?
डब्बा ट्रेडिंग हे शेअर बाजाराशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांचे जाळे आहे. यात समभागांच्या दरांवर सट्टा लावला जातो, पण त्याची नोंद अधिकृत एक्स्चेंजवर होत नाही. त्यामुळे सरकारच्या नजरेआड हे व्यवहार पार पडतात. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार व काळ्या पैशाचा वापर केला जातो. यामुळे सरकारला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन, कॅपिटल गेन, सेबी टर्नओव्हर आणि इतर करांच्या माध्यमातून मिळणारा महसूल बुडतो.
पूर्वी डायरी किंवा लॅपटॉपमध्ये व्यवहारांची नोंद केली जायची, मात्र सध्या मोबाईल अॅप्स व वेब पोर्टल्सचा वापर करून बिनधास्त सट्टा खेळला जातो. प्रत्येक सट्टेबाज व पंटरसाठी वेगळा लॉग-इन आयडी व पासवर्ड तयार करून व्यवहार गुप्त ठेवले जातात. या व्यवहारांची हिशेबवही म्हणजेच ‘बुक’ टोपण नावाने उघडली जाते.
हवाला ऑपरेटरचा थेट सहभाग
या प्रकारात सट्टेबाज जिंकलेल्या रकमांची देवाण-घेवाण हवालामार्फत करतात. त्यामुळे रोखीचा कोणताही अधिकृत मागोवा लागत नाही. ईडीच्या तपासात काही मुंबईतील व्यक्तींकडून देशभरातील सट्टा खेळला जात असल्याचे समोर आले असून, त्यामुळे पकड टाळण्यासाठी टोळीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
ईडीने जप्त केलेल्या रोख रकमेसह महागड्या गाड्या व परदेशी चलनाचा तपास सुरू आहे. यातील कनेक्शन इतर राज्यांपर्यंत पोहोचले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीत डब्बा ट्रेडिंग हा काळ्या पैशाचा एक नवा मार्ग बनत चालल्याने ईडीचा हा धडाकेबाज तपास आता अधिक गंभीर वळण घेण्याची चिन्हं आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…