Mumbai News : दुबईहून महाराष्ट्रात ड्रग्जचा धंदा! ‘ड्रग्स किंग’ मुस्तफा कुब्बावाला अखेर अटकेत

•256 कोटींच्या मेफेड्रॉन कारखान्याचा पर्दाफाश; 122 किलो अंमली पदार्थासह 13 आरोपी जेरबंद
मुंबई | मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-7 पथकाने अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय जाळ्यावर मोठा घाव घालून दुबईहून भारतात मेफेड्रॉनचा पुरवठा करणाऱ्या ‘ड्रग्ज नेटवर्क’चा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 256.49 कोटींच्या मालमत्तेसह मुख्य सूत्रधार मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला याला दुबईतून अटक करून भारतात आणण्यात आले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 आरोपींना अटक, तर 122 किलोपेक्षा अधिक मेफेड्रॉन (MD), कोट्यवधींची रोख रक्कम, सोन्याचे दागिने, वाहने, व स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
कारवाई कशी उलगडली?
16 फेब्रुवारी 2024 रोजी कक्ष-7 ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, परवीन बानो गुलाम शेख हिला कुर्ला (प.) येथे सापळा रचून अटक करण्यात आली. तिच्याकडून 641 ग्रॅम मेफेड्रॉन, 12.20 लाख रोख व 1.5 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त झाले.
तपास पुढे सरकताच, तिच्या संपर्कातून काम करणारा आरोपी साजीद मोहम्मद शेख उर्फ डॅब्ज (वय 25) याला अटक करण्यात आली. मिरा रोड येथून त्याच्या घरी 3 किलो मेफेड्रॉन (अंदाजे 6 कोटी) आणि 3.68 लाख रोख सापडले.
यानंतर, दुबईतील सूत्रधारांच्या सांगण्यावरून सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इरळी गावात मेफेड्रॉन निर्मितीचा कारखाना उघडकीस आणण्यात आला.
तिथून 122.50 किलो मेफेड्रॉन (अंदाजे 245 कोटी), कारखान्याचे साहित्य आणि एक वाहन जप्त करण्यात आले.
दुबई–सुरत–मुंबई ड्रग्ज नेटवर्क
कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल दुबईस्थित मुस्तफा कुब्बावाला व ताहेर डोला यांच्या मार्फत भारतात येत होता. मेफेड्रॉन तयार झाल्यानंतर सुरत येथील एजंटकडून विक्री केली जात होती. या प्रकरणात सुरतच्या दोघा एजंटांनाही अटक करण्यात आली आहे.ड्रग्ज व्यवहारासाठी वापरले जाणारे अंगडिया मार्फत रोख व्यवहार करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी मुस्तफा कुब्बावालाच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस (RCN) जारी करण्यात आली होती. युएईतून त्याला अटक करून मुंबई पोलिसांच्या पथकाने भारतात प्रत्यार्पण करून आणले. याआधी दुसरा पाहिजे आरोपी ताहेर सलीम डोला यालाही 13 जून 2025 रोजी अटक करण्यात आली होती.
यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे,उप पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन,उप पोलीस आयुक्त (प्रकटीकरण-1) विशाल ठाकूर,सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व),चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.संपूर्ण कारवाईत कक्ष-7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत,पोलीस निरीक्षक अरुण थोरात (खंडणी विरोधी पथक),सहायक पोलीस निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील काळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक परबळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार राऊत यांनी अत्यंत कुशलतेने भूमिका बजावली.


