मुंबई

Mumbai News : कोकेनचा ‘किंगपिन’ अखेर जेरबंद! थायलंडहून भारतात आणला, एनसीबीकडून धडक कारवाई

11 किलो कोकेन, 5 किलो गांजा, करोडोंच्या मालमत्तेचा पर्दाफाश

मुंबई :- भारतातील अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याचा ‘ब्रेन’ अखेर एनसीबीच्या तावडीत आला आहे! थायलंडच्या आलिशान हॉटेलमध्ये लपून बसलेल्या या किंगपिनला एनसीबीने आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने ट्रॅक करून भारतात आणले. ही कारवाई म्हणजे अमली पदार्थ विरोधातील लढ्याला मिळालेली मोठी चालना मानली जात आहे.

पोलिस तपासानुसार, हा किंगपिन मागील दोन वर्षांपासून थायलंडमध्ये वास्तव्यास होता आणि तिथून तो भारत, अमेरिका आणि मलेशिया दरम्यान कोकेन व एलएसडीचा डार्कनेटवरून व्यापार करीत होता. त्याच्या नियंत्रणाखालील टोळी भारतात कुरियर, गिफ्ट पार्सल आणि फेक कंपन्यांच्या माध्यमातून अमली पदार्थ पुरवत होती.

या तपासादरम्यान, एनसीबीने नवी मुंबईतून एक संशयित अटक केला होता, ज्याच्या घरातून तब्बल 11 किलो 540 ग्रॅम कोकेन, 4.9 किलो गांजा आणि साडे पाच किलो ‘गांजा गमीज’ जप्त करण्यात आले. या गोष्टींचा मागोवा घेत असताना एनसीबीच्या जाळ्यात अखेर मुख्य सूत्रधार सापडला.

त्याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात कार्यरत असलेल्या एका मोठ्या हवाला नेटवर्कशी त्याचे आर्थिक संबंध होते. त्याच्या नावावर थायलंडमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमधील बुकिंग्ज, विदेशी बँक खाती व बहुमूल्य मालमत्ता असल्याचे उघड झाले असून सर्व जप्तीची प्रक्रिया सुरू आहे.

एनसीबीचे अधिकारी म्हणाले, “आता खरी चौकशी सुरू होणार आहे. भारतात आणखी कोणकोणते ‘व्हाईट कॉलर’ चेहरे या जाळ्याशी जोडले गेले आहेत, हे लवकरच समोर येईल.”

vivek

Recent Posts