मुंबई

Mumbai News : माहिम परिसरात कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल, मुंबईत पहिली कारवाई

•उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मुंबई :- मुंबईतील माहिम परिसरात कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिम पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223,270 आणि 271 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दुचाकीस्वाराने माहिम येथील डॉमिनोज पिझ्झा कबूतर खाना आणि हिंदूजा रुग्णालयाजवळील कबुतरखान्यात खाद्य टाकले होते, असा आरोप आहे.

उच्च न्यायालयाने नुकतेच दिलेल्या आदेशात कबुतरांना खाद्य घालणे सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. तसेच, असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले होते. या आदेशानंतर महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केली.

काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेने दादर पश्चिम येथील कबुतरखान्यावर कारवाई करून अनधिकृत बांधकाम हटवले होते. या कारवाईला काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने नागरिकांच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही असे सांगत कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे, आता माहिममधील घटनेनंतर पोलीस पुढील तपास करत असून, लवकरच आरोपीला पकडले जाईल अशी अपेक्षा आहे.

vivek

Recent Posts