Mumbai News : बोरिवलीत 27 वर्षीय तरुणीची 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

•नैराश्यग्रस्त असलेल्या पर्ल बागुल हिने तन्वी गार्डन सोसायटीत संपवले जीवन; वडिलांनी दिले पोलिसांना जबाब
मुंबई :- बोरिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बोरिवली पश्चिमेकडील तन्वी गार्डन सोसायटीत राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीने इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पर्ल बागुल असे या तरुणीचे नाव आहे.
काय घडले?
एमएचबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 23 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास पर्लने आपल्या राहत्या सोसायटीच्या 7 व्या मजल्यावरून खाली उडी मारली.गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
नैराश्य हे कारण
पर्लचे वडील मिलिंद जयराम बागुल (63 वय) यांनी एमएचबी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, पर्ल ही आयुष्यात अपयशी ठरत असल्यामुळे नैराश्यग्रस्त होती. याच कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. या मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे किंवा कोणतीही तक्रार नसल्याचेही त्यांनी पोलिसांना स्पष्ट केले आहे.एमएचबी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून, पोलीस उपनिरीक्षक वाघोले पुढील तपास करत आहेत.
युवकांमध्ये वाढत्या आत्महत्यांची चिंता
सध्याच्या काळात नैराश्य, अपयश, प्रेमभंग, ताण-तणाव यासह अगदी क्षुल्लक कारणांमुळेही आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा मोबाईल न मिळाल्याने किंवा आई-वडिलांनी ओरडल्यानेही किशोरवयीन मुले आणि तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. या वाढत्या घटना समाजासाठी मोठी चिंता व्यक्त करणाऱ्या आहेत.



