•गीता आणि योगिता गवळींनी भरले अर्ज; 15 जानेवारीला मुंबईचं भवितव्य ठरणार
मुंबई :- मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी भायखळा परिसरात मोठी राजकीय खळबळ पाहायला मिळाली. कुख्यात गुंड अरुण गवळी ऊर्फ ‘डॅडी’ यांच्या दोन्ही कन्यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करत भायखळ्याच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. अरुण गवळींच्या अनुपस्थितीत त्यांच्या वारसदार म्हणून गीता आणि योगिता गवळी या दोघींनीही ‘अखिल भारतीय सेने’चा झेंडा हाती घेत निवडणुकीत उडी घेतली आहे.
भायखळा हा पारंपारिकपणे गवळी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. याच विभागातील ‘ई’ प्रभागातून या दोन्ही भगिनींनी आपले नशीब अजमावण्याचे ठरवले आहे. अरुण गवळींची मोठी मुलगी आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांनी प्रभाग क्रमांक 212 मधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. 2017 च्या निवडणुकीतही याच प्रभागातून त्या निवडून आल्या होत्या, त्यामुळे आपली पकड कायम ठेवण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा याच क्षेत्राची निवड केली आहे.
दुसरीकडे, अरुण गवळींची धाकटी मुलगी योगिता गवळी यांनी यंदा सक्रिय राजकारणात पदार्पण केले आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक 207 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रभागातून योगिता निवडणूक लढवत आहेत, तिथे 2012 मध्ये त्यांच्या काकी वंदना गवळी नगरसेविका होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी वंदना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने, आता या प्रभागात गवळी कुटुंबातच आमनेसामने लढत होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज वाटप आणि स्वीकृतीची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून अत्यंत वेगाने सुरू आहे. 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तिसऱ्या दिवशी एकूण 2 हजार 040 नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या तिसऱ्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी आपले अर्ज प्रत्यक्ष दाखल केले, ज्यात गवळी भगिनींच्या अर्जांचाही समावेश होता.
एकूण आकडेवारीचा विचार केला, तर गेल्या तीन दिवसांत मुंबईत तब्बल 9 हजार 049 अर्जांचे वितरण झाले असून आतापर्यंत 9 उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत असल्याने, शेवटच्या दोन-तीन दिवसांत राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. भायखळ्यातील ही ‘डॅडी’ स्टाईल लढत मुंबईच्या राजकारणात काय वळण घेते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…