
Mumbai Mahayuti Mayor Latest News : शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची आज स्वतंत्र गटनोंदणी; ‘स्मृतीस्थळा’वर अभिवादन करून कूच; एकनाथ शिंदे साताऱ्यात गेल्याने राजकीय चर्चांना उधाण
मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. भाजपचा एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळून लावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी आपल्या 29 नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे महायुतीतील ‘ऑल इज वेल’ नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अडीच वर्षांच्या अटीवरून संघर्ष पेटला मुंबईत भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने आपलाच महापौर बसवण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, शिवसेनेने (शिंदे गट) पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदाची खुर्ची आपल्याकडेच राहावी, अशी आग्रही मागणी केली आहे. या मुद्यावर दोन्ही पक्षांत एकमत होऊ शकलेले नाही. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत. दुसरीकडे, शिंदे गटाने आपल्या भूमिकेवरून माघार घेण्यास नकार दिल्याने पेच अधिकच गडद झाला आहे.
स्मृतीस्थळावरून थेट कोकण भवन
शक्तीप्रदर्शनाची तयारी आज दुपारी 12 वाजता शिवसेनेचे सर्व 29 नगरसेवक दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करतील. त्यानंतर हे सर्व नगरसेवक बसने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन येथे रवाना होतील. राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तिथे स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी केली जाईल. एकत्रित नोंदणी नाकारून स्वतंत्र गट स्थापन करणे, हा भाजपसाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
शिंदेंची ‘दरे’ वारी आणि भाजपची नाराजी
काही दिवसांपूर्वी शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याने भाजपची नाराजी वाढली होती. मुंबईत हा राजकीय तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील आपल्या ‘दरे’ या मूळ गावी निघून गेले आहेत. भाजपच्या ताठर भूमिकेवर ही शिंदेंची एक प्रकारची नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत भाजप या कोंडीवर काय मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



