Mumbai Drug News : नंदनवनात 5 लाखांचे कोकेन जप्त; मुंबईतील 10 हायप्रोफाईल तस्करांना बेड्या

Mumbai Big Profile Drug Racket Busted : सावरी येथील एमडी ड्रग्ज फॅक्टरीनंतर पोलिसांची दुसरी मोठी कारवाई; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा, पाचगणी | महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीमध्ये ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचगणी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 5 लाख रुपये किमतीच्या कोकेनसह मुंबईतील 10 तस्करांना ताब्यात घेतले आहे. साताऱ्यातील सावरी गावात नुकत्याच उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज फॅक्टरीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. Satara Mumbai Big Profile Drug Racket Busted
लक्झरी कारमधून सुरू होती तस्करी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मुंबईतून पाचगणी परिसरात कोकेन विक्रीसाठी आले होते. या कारवाईत पोलिसांनी तस्करांकडून स्कोडा आणि एमजी हेक्टर यांसारख्या महागड्या कार, मोबाईल फोन आणि ड्रग्ज असा एकूण 42 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे तस्कर पर्यटकांना टार्गेट करत होते की काय? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
मुंबईतील गुन्हेगारांचे धागेदोरे या प्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व 10 आरोपी हे मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचे भेंडी बाजार, भायखळा, नागपाडा आणि ग्रँट रोड परिसरात वास्तव्य आहे. यामध्ये महंमद नावेद सलिम परमार, सोहेल हशद खान, महंमद रिजवान अन्सारी, वासिल हमीद खान यांच्यासह 10 जणांचा समावेश आहे. हे रॅकेट थेट मुंबईशी जोडलेले असून, कोकेनचा पुरवठा कोठून झाला, याचा सखोल तपास सुरू आहे.
पर्यटनस्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पाचगणी आणि महाबळेश्वर सारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांवर ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. सावरी येथील फॅक्टरीनंतर आता थेट कोकेन तस्करी समोर आल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पर्यटनस्थळांची ऐतिहासिक आणि नैसर्गिक प्रतिमा डागाळू नये, यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे.
पोलिसांचा कडक इशारा
“साताऱ्यातील पर्यटन आणि स्थानिक समाजासाठी ही बाब अत्यंत गंभीर आहे. मुंबई कनेक्शन असलेल्या या रॅकेटचा मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. भविष्यात अशा प्रकारच्या अवैध कृत्यांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली जाईल,” असा इशारा सातारा पोलिसांनी दिला आहे.


