Mumbai Local Train : गणेश भक्तांना आणि मुंबईकरांना रेल्वेकडून खुशखबर ! पश्चिम रेल्वे लोकल अनंत चतुर्दशीला रात्रभर सुरू राहणार
•Local Train On Anant Chaturthi अनंत चतुर्दशी असून मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी येत असतात
मुंबई :- मुंबईतीही गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. थोड्याच दिवसात अनंत चतुर्दशी असून मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी येत असतात. तेच लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या वतीने गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या रात्री लोकलच्या जादा आठ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती गणपतीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होते. त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते. तसेच मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणूकही काढल्या जातात.
लालबागचा राजा, चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा, अंधेरी चा महाराजा यासारख्या गणपती ना लाखोचे भाविक निरोप देण्याकरिता मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. मुंबईसह मुंबईच्या उपनगरी परिसरातून लाखोंच्या संख्येने भाविक गणरायाला निरोप देण्याकरिता येत असतात.मोठी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांना रात्री उशीरादेखील घरी परतता येणार आहे.