Mumbai Local Train News : ठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी मार्गावर विशेष ब्लॉक; रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे होणार सर्वाधिक हाल
मुंबई | उद्या, (21 डिसेंबर) रविवारी सुट्टीच्या दिवशी बाहेर पडण्याचा विचार करणाऱ्या मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवासाची डोकेदुखी वाढणार आहे. रेल्वेच्या विविध देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तीनही उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडणार असून, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. Mumbai Local Train News
मध्य आणि हार्बर मार्गाचा असा असेल अडथळा
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत काम चालणार आहे. या काळात लांब पल्ल्याच्या गाड्या उपनगरीय जलद मार्गिकेवरून वळवण्यात आल्या आहेत. यामुळे ठाणे-कल्याण दरम्यानच्या जलद आणि धीम्या लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात पनवेल-सीएसएमटी आणि ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना रस्ते वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे.
पश्चिम रेल्वेवर ‘रात्रीचा’ दणका; 80 फेऱ्यांवर कुऱ्हाड
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आजपासून 18 जानेवारीपर्यंत विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. रविवारी 21 डिसेंबरपासून दररोज रात्री 11.30 ते पहाटे 4.30 या वेळेत सुमारे 80 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या नोकरदारांसाठी हा मोठा फटका ठरणार आहे. बोरिवली ते कांदिवली दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील वाहतूक या काळात पूर्णपणे ठप्प असेल.



