मुंबई

Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वे विस्कळीत; पश्चिम रेल्वे मात्र सुरळीत!

Mumbai Latest Mega block News : हार्बर मार्गावरील अनेक लोकल रद्द, पर्यायी व्यवस्थेमुळे प्रवाशांना दिलासा

मुंबई :- उद्या,(27 जुलै 2025) रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उपनगरीय मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभालीची महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात येणार असल्याने विविध मार्गांवर ‘मेगाब्लॉक’ जाहीर करण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील लाखो प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर धीम्या मार्गावरील लोकल थांबणार नाहीत, ज्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांना कल्याण, डोंबिवली किंवा दिवा स्थानकांवरून प्रवास करावा लागणार आहे.

मध्य मार्गावर काय बदल?

ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत मेगाब्लॉक असेल. या काळात मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली येथे लोकल थांबतील, परंतु नियोजित वेळेपेक्षा सुमारे 10 मिनिटे उशिराने पोहोचतील. त्याचप्रमाणे, कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद लोकलदेखील जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे येथे थांबून 10 मिनिटे उशिराने मुलुंड येथे पोहोचतील. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व धीम्या लोकल सुमारे 10 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल!

पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर (पोर्ट मार्गिका वगळून) सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, पनवेल ते ठाणे आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावरील काही लोकल सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी विभागात विशेष लोकल धावणार असून, ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल सेवा उपलब्ध असतील. पोर्ट मार्गावरील रेल्वे सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहील.

पश्चिम रेल्वेवर दिलासा!

एक दिलासादायक बातमी म्हणजे, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसल्याने या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुरळीत होणार आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वेळेचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

vivek

Recent Posts