Avinash Jadhav : मराठीच्या मुद्यावरून मनसेची दहीहंडी यंदा चर्चेत; अविनाश जाधवांच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Avinash Jadhav Dahi Handi : ‘म… मराठीचा’ उल्लेख करत मनसेने दहीहंडीला दिली भाषिक अस्मितेची जोड; ठाण्यात लक्षवेधी आयोजन
ठाणे :- हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात वाद सुरू असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) यंदाच्या दहीहंडी उत्सवाला मराठी अस्मितेची जोड दिली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी Avinash Jadhav Dahi Handi ठाण्यात आयोजित केलेल्या दहीहंडीच्या पोस्टरवर ‘म… मराठीचा’ असा सूचक उल्लेख केल्याने यंदाचा हा उत्सव राजकीय आणि भाषिकदृष्ट्या चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीवरून राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी याविरोधात भूमिका घेतल्याने अखेर सरकारला आपले निर्णय मागे घ्यावे लागले होते. याच काळात, मीरा-भाईंदर येथे मराठी बोलत नसल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांना अटक झाली होती. या घटनेनंतर जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार आंदोलन केले होते. आता हाच ‘मराठीचा मुद्दा’ मनसेने दहीहंडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा उचलून धरला आहे.
यंदा 16 ऑगस्ट रोजी ठाण्यातील नौपाडा परिसरात भगवती शाळेच्या मैदानात अविनाश जाधव यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीच्या प्रसारासाठी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये ‘म… मराठीचा’ असा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच, ‘मराठी सणांसाठी आणि मराठी मनांसाठी’ मनसे दहीहंडी असाही संदेश देण्यात आला आहे.
या पोस्टरमुळे मनसेच्या दहीहंडीकडे केवळ गोविंदा पथकांचेच नव्हे, तर राजकीय निरीक्षकांचेही लक्ष लागून राहिले आहे. या उत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, मराठीच्या मुद्यावर पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पोस्टरवर तरुणाईकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात मराठीच्या मुद्यावरून मनसेची भूमिका अधिक आक्रमक राहण्याचे संकेत मिळत आहेत.


