Mumbai Fraud News : आदिवासी महिलांची 2 कोटींची फसवणूक; ‘आकर्षक परताव्या’चे आमिष दाखवणाऱ्या मुख्य आरोपी रुपेश पाटीलला गुजरातमध्ये अटक

Mumbai Fraud News : गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग; मुख्य आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी, 5 आरोपी अजूनही फरार.
पालघर :- आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून पालघर तालुक्यातील गरीब आदिवासी महिलांकडून दोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करत त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला पालघर पोलिसांनी Palghar Policeगुजरात राज्यातील वापी येथून अटक केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास पालघर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आला होता. Palghar Latest Fraud News
मोबदल्याची रक्कम बनली लक्ष्य
पालघर तालुक्यातील बहाडोली येथील रुपेश पाटील आणि त्याची पत्नी कल्पना पाटील यांनी फसवणुकीचा हा मोठा डाव रचला होता. मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गात जमीन संपादित झाल्यामुळे मोबदला मिळालेल्या धुकटण परिसरातील गरीब आदिवासी महिलांना त्यांनी लक्ष्य केले. गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक 16 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून या पती-पत्नीने महिलांकडून दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा केली होती. ही जमा केलेली रक्कम त्यांनी गुजरात राज्यातील एका क्रेडीट सोसायटीमध्ये गुंतवली होती.
मुदत पूर्ण झाल्यावर फसवणूक उघड
गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर महिलांनी आपली मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने महिलांनी रुपेश आणि कल्पना पाटील यांच्याविरोधात मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले होते.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नारळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.
मुख्य आरोपीला वापीतून अटक
या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीता आथने, पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाठ आणि हवालदार कैलास बोंड यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवली. तब्बल दोन महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी रुपेश पाटील याला अखेर रविवारी गुजरात राज्यातील वापी येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली.
रुपेश पाटील याला पालघर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीची पत्नी कल्पना रुपेश पाटील हिच्यासह गुजरात राज्यातील इतर चार आरोपी अजूनही फरार असून, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहे.


