क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Fake Lover Group : मुंबईत ‘प्रेमभंग’ झालेल्या तरुणांना लुटणारी टोळी जेरबंद!

Mumbai Fake Instagram Lovers Group Arrested : इन्स्टाग्रामच्या जाळ्यातून लाखोंची फसवणूक; राजस्थानमधून दोन आरोपींना अटक

मुंबई :- प्रेमभंग झाल्याने निराश झालेल्या तरुण-तरुणींना इन्स्टाग्रामवर जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुंबई पोलिसांनी Mumbai Police पर्दाफाश केला आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून 16 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या कक्ष-2 Mumbai Crime Branch Unit 2 ने केली.

मुंबईतील एका 52 वर्षीय महिलेने पायधुनी पोलीस ठाण्यात त्यांच्या घरातून 129 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम चोरी झाल्याची तक्रार दिली होती. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला असता, फिर्यादीच्या मुलीची चौकशी करण्यात आली. चौकशीत मुलीने सांगितले की, तिचा तिच्या प्रियकराशी प्रेमभंग झाला होता. यामुळे ती निराश होती. याच काळात तिने इन्स्टाग्रामवर ‘खोया हुआ प्यार पाये’ अशा पोस्ट पाहिल्या. त्यातील एका ‘Irfan khanji’ नावाच्या अकाऊंटवर तिने संपर्क साधला.

या अकाऊंटवरून बोलणाऱ्या आरोपींनी स्वतःला ‘मौलवी’ असल्याचे भासवले. त्यांनी मुलीला सांगितले की, ‘तुमचे प्रेम परत मिळवण्यासाठी काही खास वस्तू लागतील, जसे की सोन्याची माशी, सोन्याचा दिवा, वांदी मटकी’ वगैरे. या वस्तूंसाठी आरोपींनी मनी ट्रान्सफरद्वारे लाखोंची रक्कम घेतली. तसेच, त्यांनी स्वतः मुंबईत येऊन मुलीकडून तिच्या घरातील सोने घेतले.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि माहितीचा वापर करत या टोळीचा माग काढला. त्यांना राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे सापळा रचून विकास मनोजकुमार मेघवाल (वय 22) आणि मनोज श्यामसुंदर नागपाल (वय 30) या दोघांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 13 लाख रुपये किमतीचे 129 ग्रॅम सोने आणि 3 लाख 18 हजार रुपये रोख असा एकूण 16 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीने हरियाणा आणि दिल्लीमध्येही अशाच प्रकारे अनेक तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, पोलीस उप आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष), नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-दक्षिण,दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस निरीक्षक, प्रशांत गावडे, पोलीस हवालदार उतेकर, तळेकर, पाडवी, बोरसे, थिटमे, पोलीस शिपाई डेरे, हरड, सय्यद, आव्हाड, महिला पोलीस शिपाई चव्हाण, क्षिरसागर, श्रेणी पोलीस उप निरीक्षक घाटोळ ,शिंदे,कलासने यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0