
Mumbai Political Latest News : विजयाचा उन्माद नको, विकासकामांनी उत्तर द्या! उपमुख्यमंत्र्यांचा नगरसेवकांना मोलाचा सल्ला; महापौर निवडीपर्यंत नगरसेवक राहणार ‘रडार’खालीच
मुंबई l मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तेच्या चाब्या आपल्याकडे ठेवण्यासाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, 29 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या नगरसेवकांची ‘किल्लेबंदी’ मजबूत केली आहे. वांद्रे येथील आलिशान ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलमध्ये गेल्या 43 तासांपासून शिंदेंच्या 29 नगरसेवकांचा मुक्काम असून, जोपर्यंत मुंबईचा महापौर निश्चित होत नाही, तोपर्यंत ही तटबंदी कायम राहण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांना कोणत्याही अमिषाला बळी पडू न देण्यासाठी आणि एकजूट राखण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
या मुक्कामादरम्यान आज सर्व नगरसेवकांना नवी मुंबईतील बेलापूर येथील कोकण भवन येथे नेले जाणार आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांची अधिकृत नोंदणी करण्यासाठी ही धावपळ सुरू असून, सुरक्षेच्या कारणास्तव विशेष बसचे नियोजन करण्यात आले आहे. कडेकोट बंदोबस्तात या नगरसेवकांना बेलापूरला नेले जाईल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच पुन्हा हॉटेलवर आणले जाईल. या प्रक्रियेमुळे मुंबईच्या राजकारणातील ‘हॉटेल पॉलिटिक्स’ आता नव्या टप्प्यावर पोहोचले असून, सत्तेचा दावा करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यावर शिंदे गटाचा भर आहे.
दरम्यान, काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हॉटेलवर जाऊन आपल्या सर्व शिलेदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना विजयाचा ‘कानमंत्र’ दिला. “निवडून आल्यानंतर कुणीही उन्माद बाळगू नका, विरोधकांच्या टीकेला तोंडी प्रत्युत्तर देण्यापेक्षा आपल्या प्रभागातील विकासकामांनी त्यांना गप्प करा,” अशा कडक सूचना त्यांनी दिल्या. जनतेमध्ये शिवसेनेची प्रतिमा उंचावण्यासाठी आपला ‘स्ट्राईक रेट’ चांगला ठेवा आणि राज्य सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे निर्देशही त्यांनी दिले. मुंबईच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी या नगरसेवकांचे संघटन किती महत्त्वाचे आहे, हेच शिंदेंच्या या भेटीतून अधोरेखित झाले आहे.


